एकटी 

अग ! ऐकलेस का ! काल त्या 9 नंबर कडे 7-8 पुरुष आले होते. तिन-चार तास होते म्हणे घरात.
अग ! हो ! रात्री 10-10.30 गेले सगळे. आमच्या ह्यांनी पाहिले ना त्यांना बाहेर पडताना.
हि वाक्य ऐकुन मी जरा जिन्यात थबकले. माझ्या बद्दलचे बोलणे चालू होते.
कोणीतरी जाब विचारला पाहीजे तिला एकदा. काय हि मेलं थेर. अशा मुळे आपल्या सोसायटिचे नांव खराब होते. सगळी सज्जन माणसे राहतात म्हण ईथे.
हो ! ग ! आपण सर्व जणी मिळुन विचारु एकदा.
आता मात्र माझा संयम सुटला. दमुन भागुन आले होते. तरी पण याचा सोक्षमोक्ष लावायचा आज व मी त्याच जोशात पुढे सरकले.

काय ! कोणाला ! विचारायचा आहे जाब मला.
काय वाईट वागते हो मी. कधी तुमच्या कडे काही मागायला आले आहे का ? का मेंटेनस चुकविला आहे. का दारु पिऊन धिंगाणा घालते मी. आणि मला नावे ठेवताना आपल्या घरात जरा डोकावुन बघा. म्हणे सगळे सज्जन रहातात ईथे. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. आज यांची कुंडलीच मांडायची ठरविले मी.

काकू ! तुमचा नवरा सज्जन आहे ना ! परवा तुमचा नवरा मला विचारत होता. अशी एकटी का रहातेस. हौस नाही. मौज मजा नाही. तुझा वाढदिवस आहे ना चार दिवसांनी. मी तुला हाॅटेल मधे पार्टी देतो. हि पण माहेरी गेली आहे. कॅन्डल डिनर घेऊ आपण. म्हटले तुम्हाला कसा माहित माझा वाढदिवस. अग ! एफ.बी. वर पाहिली ना तुझी जन्म तारीख. हा तुमचा सज्जन नवरा.

आणि ताई ! तुमचा मुलगा. आठ दिवसां पुर्वी लेडीज बार मधल्या धाडीत पकडला होता पोलीसांनी. तो इंन्स्पेक्टर माझा काॅलेज मेट होता. सोसायटीचे नांव समजल्यावर मला फोन लाऊन सांगितले. व माझा शेजारी आहे सोडुन द्या हे सांगीतल्यावर फक्त दम देऊन सोडुन दिले. हा सज्जन !!

मावशी ! तुमचा मुलगा. काॅलेजला जाताना मला काल सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा व सेंटची बाॅटल घेऊन आला होता आणि 6 ते 9 सिनेमाच्या शोची ऑफर देऊन गेला.
काल गेले असते ना त्याच्या बरोबर सिनेमाला, तर आज हे तुम्ही बोलु शकला नसतात.

आणि काकु ! दोन विंग सोडुन रहाणारा तुमचा भाऊ ! आठ दिवसांपुर्वि आमच्या मजल्यावरची ट्युब घालवुन, माझ्या दारा समोर ऊभा होता. पण शेजारच्या कदम काकू माझ्या बरोबर बघुन ” हं हं हं ! ट्युब गेली म्हणुन बघायला आलो होतो. ” म्हणुन पसार झाला. दोन विंग सोडुन रहाणार्या तुमच्या भावाला आमच्या मजल्यावरची ट्युब गेली आहे हे कसे काय समजले हो ! विचारणार का जाब त्याला.

हं ! म्हणे सज्जन रहातात ईथे. हिच व्याख्या आहे का तुमची सज्जनपणाची.
अहो ! मी ईथे एकटी रहाते. नोकरी करुन माझे आणि गावी माझ्यावर अवलंबून असलेल्या माझ्या वयस्कर आई-वडिलांचे पोट भरते. माझ्या दोन लहान बहिणीचे शिक्षण करते. काय माहिती आहे तुम्हाला माझ्या बद्दल. आपली उचलली जीभ लावली टाळ्याला.
अरे ! तुम्ही पण एक स्त्रि आहात. तुम्ही तरी मला समजुन घेतले पाहीजे होते. मला एकटी बघुन आपुलकीने मदत करायची सोडुन मलाच जाब विचारला येताय.

मला आता पुढचे बोलवेना. गोळा केलेला सगळा जोश संपत आला होता. एक जोरदार हुंदका बाहेर पडला आणि मी धावतच माझ्या ब्लाॅक मधे शिरले. बेडवर पडुन ओक्साबोक्षी रडायला लागले. अर्ध्या तासाने उठले. फ्रेश झाले. कपडे बदलले. जेवण करायची ईच्छाच नव्हती. तशीच बेडवर पडुन विचार करायला लागले.

मला हौस मौज करावीशी वाटत नाही का ? आज माझे वय 30 आहे. योग्य वयात लग्न झाले असते तर आज दोन मुलांची आई झाले असते मी. मला नाही वाटत का माझा हि संसार असावा. एक-दोन गोजीरवाणी मुले असावीत. पण या घरच्या जबाबदार्या सांभाळताना नाही मी लग्न करु शकत. आई-वडिल, दोन लहान बहीणींचे शिक्षण, त्यांची लग्ने या सर्व जबाबदार्या मलाच, एका मुला प्रमाणेच पार पाडायच्या आहेत.
कोण सांगणार यांना समजावून. एकटी स्त्रि म्हणजे यांना आपली मालमत्ता वाटते. मदत करायच्या उद्देश्याने जवळीक साधतात. मिळेल तिथे चान्स घ्यायला बघतात.

काल आलेले पण तसलेच. पण ऑफिस मधले असल्याने टाळता पण आले नाही. कोण समजतात हे स्वताला. अबलांचे कैवारी. स्त्रि एकटी रहाते समजल्यावर लागले लगेच हुंगायला. मला हे समजत नाही असे वाटते कि काय यांना. घरापर्यंत सोबत काय करतील. पैशाची मदत काय करतील. गोड गोड बोलतात आणि भुलवायचा प्रयत्न करतात.

जाऊ दे ! म्हणुन फेसबुक ओपन केले. बघते तो काय. 55 वाढदिवसाच्या शुभेच्छा. In box मधे 15 मेसेजेस. कोणी गिफ्ट घेतल्याचा मेसेज…कोण थिएटर जवळ वाट पाहतोय…कोण हाॅटेल बुक करायला तयार…कोणी चोरलेली शायरी केलेली…एकाने तर “असा किती दिवस एकटीने वाढदिवस साजरा करणार, दोघे मिळुन साजरा करु. कायम लक्षात राहिल अशी गिफ्ट देईन”. असा द्विअर्थी मेसेज. शी ! ईतकी उबग आली ना मेसेज वाचुन.
फेसबूक वर पण एकटी असणारी स्त्रि सुरक्षित नाही हेच खरे.

अरे ! स्त्रि एकटी रहाते म्हणजे काय तुमच्या मनोरंजनासाठी सदैव available आहे कि काय ? का एकटी रहाते ? कुठल्या कारणाने अशी एकटी रहाते ? याचा विचार करा ना ! या लांडग्यांच्या दुनियेत अशी एकटी स्त्रि कशी स्वतःला सांभाळत असेल.

सोसायटी मधे तेच. ऑफिसमधे तेच. फेसबुकवर पण तेच. एकटी स्त्रि या जगात कुठेच सुरक्षित नाही हेच खरे आहे.

अरे ! वर्षभर स्त्रिचा मान राखा फक्त एक दिवस आमचा मान म्हणुन Woman’s Day साजरा करु नका.

ऑफिसमध्ये बाॅस असलेली स्त्रि चालत नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन नोकरी करणारी स्त्रि नको असते. ति पैसा कमविते, पण त्या पैशावर पुरुषी अधिकार. स्त्रिचे गुणगान करताना पुरुषी अहंकार आड येतो.

उद्या Woman’s day ला शुभेच्छांचा पाऊस पडेल सगळीकडे. बायकांचे गुणगान होईल. नंतर परत वर्षभर हाच मनस्ताप.
“नाही मिळत संधी, तो वर साधू
मिळाली संधी, कि संधीसाधू”

थोरा मोठ्यांच्या बायकांचे कौतुक केले जाते. पण आमच्या सारख्या सामान्य बायकांचे काय. सर्वच बायका या थोर असतात. पण म्हणतात ना ! “घर कि मुर्गी दाल बराबर” तसेच सामान्य बायकांचे होते. प्रथम आपल्या घरातील बायकांचे कौतुक करायला शिका म्हणावं.

आज अशा कितीतरी जणी एकट्या रहात आहेत. कोणी आई-वडिलांना आधारासाठी. कोणी करिअर साठी. कोण घटस्फ़ोटीता म्हणुन. तर कोणी नवर्याने टाकलेली म्हणुन.

कारणे अनेक पण रिझल्ट एकच ” एकटी “