पाऊस करार

पाऊस करार

पावसा तुझी हजेरी
मनास सुखवून गेली,
मरगळलेली धरित्री कशी
अलवार न्हावून निघाली

माणूस मात्र असतो
कामापुरताच मामा,
एकदा निभावले की
कायम त्याचा वरचश्मा

आता पुन्हा तो विसरेन
दुष्काळाच्या झळा,
अन पुन्हा पिकवीन
प्रदुषणाचा मळा

कचरा ओला असो की सुका
तो बाळगणार नाही तमा,
देवादिकांच्या मुर्त्याही
दिसतिल सागरात जमा

लोभापोटी तस्करींना
येवू लागेल उधाण,
चंदन असो वा हरीण
नसेल त्याजला भान

पीक-पाणी,औषधे सारी
भेसळीने ऊतू जाणार,
कुणाचे न सोयरसुतक त्याला
तो आपलीच तुंबडी भरणार

पावसा तू जाण्यापूर्वी
कर माणसासोबत ‘करार’
चांगुलपणाची खात्री करून
मगच हो बरे ‘फरार’

………

जयश्री पाटील