शारदास्तवनाच्या समासामध्ये शारदामातेचे स्तवन करुन समर्थांनी आपण मांडलेल्या ग्रंथ प्रपंचासाठी उत्तम शब्दसामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून आशीर्वाद मागुन घेतला आहे. वाणीचे महत्व दासबोधाप्रमाणे समर्थांनी मनाच्या श्लोकात देखील स्पष्ट केले आहे,


स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे निववावे ।

लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थांनी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकाणी “टिमवर्क” असते तेव्हा परस्परांच्या सहाय्याने कोणतेही काम पूर्णत्वाला जात असते. अशावेळी एकमेकांना समजावून घेऊन कोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल , दुस-याला जाणून घेण्याची क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपण पहातो.

जगामध्ये जगमित्र । जीव्हेपाशी आहे सूत्र ॥

लोकसंग्रहाचे केवढे महत्वाचे सूत्र समर्थ आपल्याला सांगतात. आपल्या बोलण्यातून आपण अनेक मित्र जोडत असतो तसेच अनेक शत्रू देखील निर्माण करत असतो. जगात जर जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिव्हेपाशी आहे. ’ उत्तमपुरुष लक्षण ’ याविषयी निरुपण करताना स्वत:वरुन दुस-याचे अंत:करण कसे जाणावे याचे सोप्पे सूत्र सांगितले आहे.

कठीण शब्दे वाईट वाटते । हे तो प्रत्ययास येते ।
तरी मग वाईट बोलावे ते । काय निमित्ते ॥

माणसाने नेहमी स्वत:वरुन दुस-याची परीक्षा करावी. दुस-याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुस-याचे मन दुखावू शकते. दुस-याचे मन दुखावणे ही एक प्रकारे हिंसाच आहे. अशी मानसिक हिंसा आपल्याकडून घडू नये यासाठी समर्थ आपल्याला सावध करतात.

आपणास चिमोटा घेतला । तेणे कासाविस जाला ।
आपणावरुन दुस-याला । राखत जावे ॥

अव्दैताचे प्रत्यक्ष व्यवहारिक स्वरुप समर्थांनी या विचारातून शिकविले आहे.

जगामध्ये जगमित्र होण्यासाठी प्रथम एकमेकांविषय़ी वाटणारा राग, व्देष, मत्सर, या दुर्गुणांचा त्याग होणे गरजेचे आहे. स्वत:च्या विकासासाठी सुदृढ आरोग्यासाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी समर्थांनी षड्रिपुंवर विजय मिळवण्यास सांगितले आहे. क्रोध हा माणसाचा प्रधान शत्रू आहे हा क्रोध बळावतो कसा तर समर्थ म्हणतात,
अभिमानें उठे मत्सर | मत्सरें ये तिरस्कार |
पुढें क्रोधाचा विकार | प्रबळे बळें ||

विचारशक्ती नष्ट करणारा, स्वत:बरोबर इतरांचा नाश करणा-या क्रोधावर विजय मिळवण्याची शिकवण समर्थ देतात. भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट्पणे सांगितले आहे की, ” क्रोधामुळे भ्रम होतो, विवेक सुटतो, भ्रमामुळे तसेच अविवेकामुळे विस्मरण होते,विस्मरणामुळे निश्च्यात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीनाश झाला , विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो  स्वत: बरोबर इतरांचा नाश करणा-या क्रोधाला मनातून हद्दपार करायला सांगुन समर्थ आपल्याला सावधच करतात. एखाद्या भुकंपाप्रमाणे आपल्या शरीराची व मनाची हानी करणा-या क्रोधावर विजय मिळवून आनंदी जीवन जगण्याची कलाच समर्थ आपल्याला शिकवतात.

जय जय रघुवीर समर्थ