आज आपण तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत. शिवरायांची महानता ही की त्यांनी कोणतीही परंपरा, वारसा नसताना शून्यातून स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या जन्मापूर्वी सुमारे तीनशे वर्षांपासून या महाराष्ट्रात गुलामगिरीचा अंध:कार पसरला होता.जुलमी सुल्तानशाहीने अवघा महाराष्ट्र भरडून काढला होता. महाराष्ट्राची संस्कृती, धर्म, लोकजीवन,मंदिरे, श्रद्धास्थाने ,अस्मिता या सगळ्या गोष्टींवर परकीय सत्तेचा वरवंटा फिरला होता. लोकांमध्ये गुलामगिरीची मानसिकता निर्माण झाली होती, अशा वेळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राचे भाग्य उजळले. मूठभर मावळ्यांच्या मदतीने महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा राजा जनतेला आपला वाटू लागला. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडलेल्या जनतेला राजांचा मोठाच आधार होता. कसा होता हा राजा ?

सकल सुखांचा केला त्याग
म्हणोनि साधिजे तो योग्य
राज्यसाधनाची लगबग, ऐसी केली .

शिवराय हे राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. राजा आणि सुखांचा त्याग ही कल्पनासुद्धा आजच्या काळात असंभव वाटणारी आहे ; परंतु शिवराय हे त्यागाचे मूर्तिमंत प्रतिक होते. स्वतःबरोबरच वैयक्तिक सुखाचा त्याग करून राष्ट्रासाठी कोणत्याही समर्पणाला तयार असणारी माणसेही राजांनी घडवली. शिवरायांसारखा महापुरुष सहजासहजी घडत नाही, जन्माला येत नाही. त्यासाठी भोवतालची परिस्थिती कारणीभूत असते. या परिस्थितूनच त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते,त्यावर संस्कार होत जातात. यासाठी लागतात संस्कार घडवणारे कुशल हात. प्रसंगी कठोर नी कणखर होणारे. शिल्पकाराचे कुशल हात ज्या दगडातून मूर्ती घडवायची आहे त्यातील नको असलेला भाग मोठ्या कौशल्याने काढून टाकून टाकतात आणि मग त्या पाषाणातून सुंदर मूर्ती आपल्या नजरेस पडते.

या शिवरायांना घडवणारा एक शिल्पकार म्हणजे माता जिजाऊ. शिवरायांच्या जन्माच्या वेळीच त्यांच्यातील शिवाचा दैवी अंश जिजाऊंना जाणवला होता. भोवतालची परिस्थिती पाहून त्याही अस्वस्थ होत्या. म्हणून शिवबाचा जन्म झाल्यावर या मुलाच्या मदतीने मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन असा मनोमन निर्धार त्यांनी केला होता. या वीरमातेने शिवबाला स्वराज्याचे आणि स्वातंत्र्याचे बाळकडू पाजायला सुरुवात केली. त्यांनीच शिवबाला नीतिधर्म शिकवला,परकीय सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण केली आणि क्षात्रधर्माचे धडे दिले. त्यातून शिवाजी महाराज घडले. समर्थ रामदास, संत तुकाराम या सारख्या संतांनी त्यांच्या कार्यासाठी जनतेत अनुकूल पार्श्वभूमी तयार केली होतीच.

समर्थ रामदासांनी शिवरायांचे जे वर्णन केले आहे ते त्यांना तंतोतंत लागू पडते. आणि त्यातूनच त्यांचे जाणता राजा हे व्यक्तिमत्व उलगडत जाते-

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी । ॥१॥शिवरायांचे कैसे बोलणे ।

शिवरायांचे कैसे चालणे ।

शिवरायांची सलगी
देणे कैसी असे । ॥२॥सकल सुखांचा
केला त्याग ।

म्हणोनी साधिजे तो योग ।

राज्य साधनाची
लगबग कैसी केली । ॥३॥ याहुनी करावे विशेष ।

तरीच म्हणवावे पुरूष ।

या उपरी आता विशेष ।

काय लिहावे । ॥४॥ शिवरायांसी आठवावे ।

जीवित तृणवत मानावे ।

इहलोकी पर लोकी उरावे ।

किर्तिरुपे ॥५॥ निश्च्ययाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू ।

श्रीमंत योगी ॥६॥

शिवरायांचे आठवावे रूप असे समर्थांनी का म्हटले ? कारण आपल्या जनतेप्रती ते कर्तव्यदक्ष , दयाळू होते. पण शत्रूविरुद्ध किंवा फितुरी करणाऱ्याबाबत त्यांचे रूप कठोर होते.शिवराय बोलल्याप्रमाणे आचरण करणारे होते.म्हणून शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे कैसे चालणे असे समर्थ म्हणतात. आपल्या सहकाऱ्याना सल्ला देताना ते त्यांना प्राणापेक्षा प्रिय मानत.म्हणून जेव्हा सिंहगड जिंकला तेव्हा त्यांना किल्ला जिंकण्यापेक्षा तानाजीसारखा जिवलग योद्धा गमावल्याचे दुःख जास्त झाले.

शिवराय हे खरोखरच श्रीमंत योगी होते. एखाद्या राजासारखा आपल्या राज्याचा , त्यातील सुखांचा उपभोग त्यांनी घेतला नाही. हे तो श्रींचे राज्य समजून राज्यकारभार त्यांनी केला. हे करताना जनतेचे हित क्षणभरही नजरेआड होऊ दिले नाही. जनतेची परकीयांद्वारे होणारी पिळवणूक थांबवून प्रत्येकासाठी सुखासमाधानाचे राज्य निर्माण केले. जनतेचे हित कशात आहे हे लक्षात घेऊन राज्यकारभार केला. म्हणूनच तो जाणता राजा होता.म्हणूनच ते जनतेचा आधारवड झाले. त्यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे त्यांचे स्त्री दाक्षिण्य होय. बालपणापासून स्त्रीयांवर होणारे अन्याय , अत्याचार ते पाहत होते. समाजात स्रियांना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूकही त्यांनी पाहिली होती. म्हणून प्रत्येक स्त्रीकडे पाहताना त्यांच्या अंतरी प्रेम,आदर व सन्मानाची भावना होती. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दिलेला आदर आणि सन्मान त्यांचा स्रियांप्रती असलेला आदरभाव दाखवणारा आहे. असा राजा युगायुगातून एखादाच घडतो. त्यांचयाबद्दल कितीही लिहिले तरी ते ते कमीच आहे. अशा या युगपुरुषाला शतशः प्रणाम !