प्रत्येक मनुष्याला आजच्या धकाधकीच्या जीवनात कसं जगायचं हाच मोठा प्रश्न आहे, असे जाणवते. तसेच प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे आणि त्यासाठीच त्याची निरंतर धडपड चालू आहे. मनुष्याने भौतिक जगतात उल्लेखनीय प्रगती केली असली तरी अक्षय आनंद देणारे सयंत्र बनविणे आजवर तरी शक्य झालेले नाही. परंतु इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की संतांनी मात्र अक्षय सुख देणारे सयंत्र शोधून काढले आणि स्वानुभवाने ते सिद्ध करून दाखविले आहे. ते सयंत्र म्हणजे भक्तिमार्ग !! त्यांना हे याच जन्मी आपण राहतो त्याच जगात आपला सारखाच नरदेह प्राप्त करूनच शक्य झाले कारण ते खरे ‘दास’ झाले. जो दास होतो त्याची सर्व काळजी त्याच्या मालकास असते, असे आपण दैनंदिन व्यवहारात देखील बघतो. जो दास होतो त्यालाच खरा बोध होतो,आणि ज्याला खरा बोध होतो तोच ‘रामदास’ होतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समर्थ रामदासांनी हे स्वतः जगून सिद्ध करून दाखविले आहे.

आधी केले आणि मागितले।

समर्थ रामदास स्वामींना न ओळखणारा मनुष्य महाराष्ट्रात तरी आढळणार नाही. लहान मुलांना ते ‘मनांच्या श्लोका’तून ठाऊक असतील, तर जेष्ठ लोकांना ‘दासबोधा’मुळे आणि
ज्ञानी, अधिकारी आणि साधक त्यांना ‘आत्मारामा’च्या रूपात ओळखत असतील. समर्थानी दासबोधात सांगितले आहे मी देहाने नसलो तरी दासबोधाच्या स्वरूपात आहेच.

आत्माराम दासबोध।
माझे स्वरूप स्वतःसिद्ध।
असता न करावा खेद।
भक्तजनी।।

आपल्याकडे एकाच संताला समर्थ म्हणून ओळखले जाते. हे नमूद करताना अन्य संतांना कमी लेखण्याचा बिलकुल हेतू नाही. तरीही रामदास स्वामींच्या लोकविलक्षण कार्यामुळे आपसूकच त्यांना समर्थ हे बिरुद लाभले. समर्थ पदवी किंवा बिरुद धारण केलेला हा आगळा वेगळा संत !!!

मराठवाड्यातील जांब गावी ठोसरांच्या घरात रामनवमीच्या दिवशी समर्थांचा जन्म झाला. बाळाचे नारायण असे नामकरण करण्यात आले. पुर्वापार चालत आलेली रामभक्ती आणि घरातील धार्मिक वातावरण, त्यामुळे छोटा नारायण स्वाभाविक पणे रामभक्तीत रंगून गेला. बालपणापासून विश्वाची चिंता करणारा मनुष्य काही विशिष्ट ध्येय उराशी बाळगून होता. विश्वाचा प्रपंच करण्याचे निश्चित ध्येय उराशी असल्यामुळे जरी छोटा नारायण आईला दिलेल्या वचनासाठी बोहल्यावर उभा राहिला तरी मंगलाष्टकातील सावधान !! असा शब्द ऐकताच खरोखरच सावध झाला आणि गर्दीतून वाट काढीत पळाला तो थेट टाकळीला गेला. टाकळीला गेला तेंव्हा नारायणाचे वय साधारण बारा वर्षाचेच. पण निश्चित ध्येय समोर ठेऊन मार्गक्रमण करणाऱ्यास ईश्वर खात्रीने मदत करतो आणि तसे रामरायाने केले देखील.

सामर्थ्य आहे चळवळीचे।
जो जे करील तयाचे।
परंतु तेथे भगवंतांचे।
अधिष्ठान पाहिजे।।

बाराव्या वर्षी सुरु केलेल्या ज्ञानसाधनेचा एक टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर नारायण देशाटन करण्यासाठी टाकळीतून बाहेर पडला. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत अखंड देश पायाखाली घालून त्यांनी समाज पुरुषाची ओळख करून घेतली. तो काळ मोगलाईचा. एकाच वेळी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा. हिंदूंना नेतृत्व नाही,कोणाचा आसरा नाही. दाद मागायला हिंदूंचा राजा नाही. समाज असंघटित आणि पराजयाच्या मानसिकतेत अडकलेला. जातीपाती, कर्मकांड आणि अंधश्रद्धा, चुकीच्या धार्मिक रूढीमध्ये फसलेला होता. या समाजाचे संघटन करणे, समाज शक्तिशाली करणे गरजेचे होते. त्यासाठी नुसते भजन न करता शरीरसंपदा बळकट करण्याची आवश्यकता होती. म्हणून देशाची स्थिती समजून घेत असताना नारायणाने चिंतन करून संपूर्ण भारतभर शेकडो मठ स्थापन केले तसेच हनुमंताची मंदीरे स्थापन करून तरुणांना व्यायामाची सवय लावली. अन्याय सहन न करता त्याचा प्रतिकार करायचा असतो हे शिकविले. त्यासाठी प्रत्येक मठात एकेका महंतांची योजना केली. त्यावेळची संपर्काची साधने बघितली तर इतकं लोकविलक्षण कार्य बघून मन अचंबित होते.

टाकळी तील ज्ञानसाधना आणि देशाटनामध्ये आलेले अनुभव यांचा सुरेख संगम म्हणजे दासबोध. नाना विविध ग्रंथाचा अभ्यास करून, त्यावर सखोल चिंतन करून समर्थांनी दासबोधाची रचना केली. सामान्य मनुष्याला दैनंदिन व्यवहार करताना, किंवा एखाद्या साधकाला साधनेच्या सुरुवातीला किंवा साधनेच्या कोणत्याही टप्प्यावर दासबोध ग्रंथ उपयुक्त आहे. यातील एकूण मांडणी आणि भाषा जरी तत्कालीन प्राकृत असली तरी समजण्यास अत्यंत सोपी आहे.

सामान्य मनुष्याने प्रपंच कसा करावा, इथपासून याच जन्मात मुक्ती कशी मिळवावी इथपर्यन्त, तसेच वनस्पती, शेती, विज्ञान, वैद्यक, संघटन शास्त्र, व्यवस्थापन , शिक्षण आदि . अशा विविध पैलूंवर या दासबोधात विस्तृत आणि सखोल प्रकाश टाकला आहे. आपल्याला पडणार नाहीत असे अनेक प्रश्न विचारून समर्थानी त्याची उत्तरे दिली आहेत. मुख्य म्हणजे हा ग्रंथ संवादात्मक आहे. दासबोध वीस दशकात आणि प्रत्येकी दहा समासात विभागला गेला आहे. भारतात दशमान पद्धती चारशे वर्षापूर्वीही प्रचलित होती याचे दासबोध मूर्तीमंत उदाहरण आहे.

समर्थांनी दासबोध लिहिला तेंव्हा त्यांचा अंतःस्थ हेतू काय होता, याची कल्पना करणे, हे माझ्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. संतांचे ग्रंथ हे मृत्यपत्राप्रमाणेच असतात. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराजांचे एक वचन आठवते. ज्या आईवडिलांना आपली मुले आपल्या पाठीमागे नीट वागतील अशी खात्री असते, ते मृत्यू पत्र लिहीत नाहीत. पण संतांनी ग्रंथ लिहिले ते त्यांची विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी लिहिले नसून सामान्य मनुष्याच्या कल्याणासाठी आईच्या कळवळ्याने लिहिले आहेत. त्यामुळे सामान्य मनुष्याने संतांच्या मृत्यपत्रानुसार म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथानुसार आचरण केले तर मनुष्याचे अवघे जीवन खात्रीने उजळून निघेल, आणि त्याला निरंतर सुखाचा मार्ग खात्रीने गवसेल यात शंका नाही. दासबोध हा उद्धरून नेणारा ग्रंथ आहे असा आधीच्या बऱ्याच पिढयांनी अनुभूती घेऊन सांगितले आहे. आपण सर्वांनी तशी अनुभूती घेण्याचा यथामती प्रयत्न करूया.

इथून पुढे प्रत्येक सोमवारी एकेका समासावर यथामती विवेचन लिहिण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ‘मला आकलन झालेला दासबोधातील बोध’असे त्याचे स्वरूप असेल. एकेक समासावर विवेचन वाचताना आपणही तो समास आधी एकदा तरी वाचावा अशी कळकळीची विनंती. जेणेकरून तो समजून घेणे सुलभ होईल. मी एक अज्ञ मनुष्य आहे, फक्त माझ्या सद्गुरुंच्या आधारे श्री समर्थांच्या दासबोधावर चार ओळी लिहिण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. श्री सद्गुरू माझ्याकडून लिहून घेतील असा पूर्ण विश्वास आहे. म्हणून परस्परांच्या संवादातून , अभ्यासातून ‘दासबोधातील नवनीत’ आपल्याला सर्वाना प्राशन करता येईल असा विश्वास आहे. तरी सुजाण वाचकांनी त्यातील त्रुटी माझ्या निदर्शनास आणून द्याव्यात ही नम्र विनंती.

श्री सद्गुरूंचे स्मरण करून या पावन कार्यास प्रारंभ करतो. आपल्या सारख्या सुजाण वाचकांचे आशीर्वाद हे मला नित्य ऊर्जा देतील असा विश्वास आहे.

श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ।